Ad will apear here
Next
दिन है बहार के...
१८ मार्च हा अभिनेते शशी कपूर यांचा जन्मदिन. त्यांनी अभिनय केलेल्या अनेक चित्रपटांमधील गाणी श्रवणीय होती. त्यापैकीच एका गाण्याचा आस्वाद आपण आज ‘सुनहरे गीत’ सदरात घेऊ या. ते गाणे आहे १९६५च्या ‘वक्त’ चित्रपटातले... शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित झालेले... दिन है बहार के...
.........
एखाद्या कर्तृत्ववान पित्याचा मुलगा त्याच्यासारखाच कर्तृत्ववान निपजतो असे सामान्यपणे घडत नाही. उलट अनेक वेळा वडिलांच्या कर्तृत्वाच्या आसपास पोहोचेल, असेही मुलाचे कर्तृत्व नसते. अर्थात असे प्रत्येक वेळी घडतेच असे नाही. यालाही काही अपवाद असतात आणि हिंदी चित्रपटसृष्टीत तर याचे एक मोठे उदाहरण आहे ते म्हणजे पृथ्वीराज कपूर आणि त्यांची मुले! पृथ्वीराज कपूर यांचे चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीला मोठे योगदान होते. आणि त्यांच्याप्रमाणे त्यांच्या एका नव्हे तर तीन मुलांनी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये आपापल्या कर्तृत्वाचे झेंडे रोवले! मोठा मुलगा राज कपूर आणि नंतरचा शम्मी कपूर यांनी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवला.

...आणि तिसरा मुलगा शशी कपूर याने तर रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. बालकलाकार म्हणून तो चित्रपटसृष्टीत आला. नायक म्हणून स्थिरावला, सहनायकही बनला. त्याच वेळी सहदिग्दर्शक व दिग्दर्शकही झाला. परंतु दिग्दर्शनात त्याला जास्त रुची नव्हती. म्हणून तो चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरला. त्याचबरोबर आपल्या वडिलांच्या पृथ्वी थिएटरचा विस्तार, आधुनिकीकरण करून त्यामध्ये मान्यवरांची हिंदी, इंग्रजी, मराठी नाटके साकार करण्याची परंपरा कायम ठेवली. त्याच्यामुळेच आज पृथ्वी थिएटर ही मुंबईतील एक लोकप्रिय, आदर्श सांस्कृतिक वास्तू बनली आहे.

राज कपूरच्या ‘आग’ आणि आवारा चित्रपटात शशी कपूरने राज कपूरच्या बालपणाची भूमिका साकार केली. ‘आवारा’मध्ये गोंडस दिसणारा शशी कपूर तारुण्यात राजस दिसू लागला. त्याचा देखणा, गोड चेहरा पाहिल्यावर हे लक्षात येऊ लागले, की हिंदी चित्रपटसृष्टीतील देव आनंदनंतर एवढा छान व सुंदर दिसणारा नायक म्हणजे शशी कपूर होय! १८ मार्च १९३८ रोजी कोलकात्यात शशी कपूरचा जन्म झाला.

...पण या राजस चेहऱ्याच्या बळावर नायक म्हणून स्थिरावण्याकरिता अभिनयाचा वारसा असूनही शशी कपूरला सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला. कारण तो तरुणपणी जेव्हा चित्रपटाचा नायक बनण्यासाठी धडपडत होता, तेव्हा चित्रपटसृष्टीत अशोक कुमार, दिलीप-राज-देव, धर्मेंद्र, राजेंद्रकुमार, शम्मी कपूर असे नायक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत होते. आणि या सर्वांमधून त्याला पुढे जायचे होते.

१९६० ते १९७०चे दशक प्रेमकथांचे होते. छान छान दिसणाऱ्या नायकांचे होते आणि चित्रपटसृष्टीत येणाऱ्या नवनवीन निर्मात्यांचे होते. त्यामुळेच शशी कपूरला काही भूमिका मिळत गेल्या. त्याचे चित्रपट येत राहिले. लोकांना तो भावत राहिला. अभिनेत्री नंदा व शर्मिला टागोर यांच्याबरोबरचा शशी कपूर प्रेक्षकांना आवडल्यामुळे या दोन्ही नायिकांबरोबरच्या त्याच्या चित्रपटांची संख्या थोडी अधिक होती.

बदलत्या काळानुसार चित्रपटांची कथानके बदलली, मल्टिस्टारकास्ट चित्रपटांचा काळ सुरू झाला आणि त्यामध्येही शशी कपूरने स्वतःचे स्थान निर्माण केले. समोर अमिताभसारखा महान अभिनेता असो अगर अन्य कोणी, तेथे आपल्या अभिनयातील अनुभवाच्या आधारे शशी कपूरने बाजी मारली! अमिताभबरोबरचे त्याचे चित्रपट लोकांना भावले. तेथे त्याचे नाव रवी असायचे व अमिताभचे नाव विजय असायचे. या बदललेल्या काळात शशी कपूर हा प्रचंड मागणी असणारा कलावंत होता. त्या काळातील त्याचे चित्रपट पाहता असा प्रश्न पडायचा, की शशी कपूरने कसल्या कसल्या चित्रपटात भूमिका केल्या? ...पण अनेक व्यावसायिक चित्रपटातील कामांमधून मिळालेल्या पैशांमधून शशी कपूरने ‘विजेता’, ‘जुनून’, ३६ चौरंगी लेन, उत्सव, कलयुग यांसारखे कलात्मक चित्रपट निर्माण केले व उत्कृष्ट चित्रपटांचा एक निर्माता म्हणून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्याच्या या साऱ्या कार्याचा गौरव २०१४चा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन करण्यात आला. त्याव्यतिरिक्तही अनेक मानसन्मान, पुरस्कार त्याला देण्यात आले होते. 

असा हा कलावंत एक संपन्न आयुष्य जगून चार डिसेंबर २०१७ रोजी हे जग सोडून निघून गेला. शशी कपूरवर चित्रित झालेली गाणी हा एक स्वतंत्र विषय आहे. हसीना मान जाएगी, आमने-सामने, जब जब फूल खिले, शर्मिली, वक्त, काला पत्थर, दिलने पुकारा, जुआरी, चोर मचाए शोर, फकिरा, प्रेमकहानी अशा त्याच्या अनेक चित्रपटांमधील गीते श्रवणीय होती.

शर्मिला टागोर व शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेल्या १९६५च्या ‘वक्त’ चित्रपटातील एक गीत अत्यंत श्रवणीय व प्रेक्षणीय होते. या चित्रपटातील त्याची भूमिका त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आणि स्वभावाला साजेशी होती आणि त्याच अनुषंगाने साहिर लुधियानवी यांनी अर्थपूर्ण गीत लिहिले होते. संगीतकार रवी यांनी त्याला एका मधुर चालीत गुंफले होते. आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेले हे गीत म्हणजे दोन प्रेमिकांच्या मधील एक संवाद होता. ‘ती’ त्याच्या प्रेमात पडली आहे, पण ‘तो’ तिला प्रीतीचा हा मार्ग इतका सोपा, साधा, सरळ नाही हे सांगतो आहे, अशा आशयाचे हे गीत आणि त्याला तालबद्ध संगीत...

त्या तालासुरात ती म्हणते - 

दिल के सहारे आजा प्यार करे 

अरे माझ्या प्रियकरा, आपल्या जीवनातील हे दिवस (प्रेमाच्या) वसंत ऋतूचे आहेत. एकमेकाला (प्रेमाच्या) आणाभाका देण्याचे आहेत. (तरी तू) हृदयातील प्रेमभावनेच्या आधारे प्रीती फुलवण्यासाठी ये!

तिच्या या बोलण्यावर ‘तो’ म्हणतो –

दुश्मन है प्यार के जब लाखो गम संसार के 
दिल के सहारे कैसे प्यार करे

अग प्रिये, तू म्हणतेस ते खरे आहे; पण या प्रेमाच्या मार्गात शत्रू खूप असतात (आणि) या दुनियेतील लाख दु:खेही या मार्गात असतात. मग तूच सांग, की हृदयातील प्रीतीची भावना मी कशी फुलवू?

त्याच्या या प्रश्नावर ती सांगते –

दुनिया का बोझ जरा दिल से उतार दे 
छोटी सी जिंदगी है हस के गुजार दे 

हे जरी खरे असले, तरी हे प्रिया मनावरचे/हृदयावरचे (या विचारांचे) दडपण/प्रभाव जरा बाजूला ठेव (आणि) हे अल्पसे जीवन आपण हसत खेळत व्यतीत करू!

यावरही तो पुन्हा प्रश्न करतो –

अपनी तो जिंदगी बीती है जी को मार के 
दिल के सहारे कैसे प्यार करे 

हे मान्य आहे. परंतु माझे जीवन तर आजपर्यंत मी माझे मन मारूनच जगत आलो आहे. (मनाजोगे काहीच घडले नाही. त्यामुळे फक्त दु;खी जीवनच मी जगत आलो आहे. मग तूच सांग, की) हृदयातील प्रीतीची भावना मी कशी फुलवू? (येथेही माझ्या मनाजोगे घडणार नाही.)

‘ती’ अशी वेगवेगळ्या प्रकारे मनधरणी करते, तेव्हा तो म्हणतो, की

अच्छा नही होता यूँ ही सपनों से खेलना 
बडा ही कठीन है हकीकतों को झेलना 

(अशी ही प्रीतीची/सौख्याची) स्वप्ने बघणे चांगले नाही. कारण वास्तवाला (प्रत्यक्ष परिस्थितीला) सामोरे जाणे अवघड असते, कठीण असते.

त्याच्या या वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या बोलण्यावर ती म्हणते –

अपनी हकीकतें मेरे सपनों पे वार के 
दिल के सहारे आजा प्यार करे

(वास्तवाला सामोरे जाणे अवघड आहे हे खरे, पण) माझ्या सुखद स्वप्नांपुढे अडचणींना दुर्लक्षित करून तू माझ्याबरोबर या प्रीतीच्या मार्गावरून चल!

एवढेच सांगून ती थांबत नाही, तर पुढे म्हणते -

ऐसी वैसी बातें सभी दिल से निकाल दे
जिना है तो कश्ती को धारे पे डाल दे 

(आता यापुढे) या असल्या निराशादायक गोष्टी (दुःखी विचार) मनात काढून टाक (आणि जीवन) जगायचे असेल, तर (या जीवन) नौकेला काळाच्या प्रवाहातून (वास्तवाच्या प्रवाहातून) पुढे घेऊन चल!

यावरही ‘तो’ म्हणतो -

धारे की गोद में घेरे भी है मझधार के
दिल के सहारे कैसे प्यार करे 

काळाच्या/वास्तवाच्या प्रवाहात (दु:ख, अडचणींचे) भोवरे आहेत. (आणि यामुळेच मी) हृदयातील प्रीतीची भावना कशी फुलवू?

अत्यंत आशयसंपन्न असे हे गीत - पडद्यावरचे एक आनंदी वातावरण, गंगानदीचे विस्तीर्ण पात्र, उत्साही तरुण-तरुणी, त्यांच्या नृत्याचा ठेका आणि गालाला खळी असणारे गोड चेहऱ्याचे नायक-नायिका! शशी कपूर असाच होता - विचारी, संयमी आणि राजस सौंदर्याचा! 

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(शशी कपूरच्या लहानपणचे किस्से सांगणारा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZRGCK
Similar Posts
हम भी अगर बच्चे होते... हिंदी चित्रपटसृष्टीसाठी विविध प्रकारची अजरामर प्रेमगीते लिहिलेले गीतकार शकील बदायुनी यांचा २० एप्रिल हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ या सदरात या वेळी पाहू या त्यांच्या प्रतिभेचा एक वेगळा आविष्कार असलेले गीत.... ‘हम भी अगर बच्चे होते...’
सब कुछ सीखा हमने... शोमॅन राज कपूर आणि संवेदनशील गीतकार शैलेंद्र हे दोघे खास मित्र. १४ डिसेंबर हा राज कपूर यांचा जन्मदिन, तर शैलेंद्र यांचा मृत्युदिन, हा एक विचित्र योगायोगच. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या शैलेंद्र यांनी राज कपूर यांच्या ‘अनाडी’ चित्रपटासाठी लिहिलेल्या या सुंदर गीताचा... सब कुछ सीखा हमने, ना सीखी होशियारी
दिल की ये आरजू थी... पत्रकार आणि प्रतिभासंपन्न शायर, गीतकार हसन कमाल यांचा ७७वा वाढदिवस एक जुलै रोजी होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज आस्वाद घेऊ या त्यांनी लिहिलेल्या ‘दिल की ये आरजू थी..’ या गीताचा...
जुस्तजू जिसकी थी... आपला अभिनय आणि सौंदर्य यामुळे बॉलिवूड गाजवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा १० ऑक्टोबरला वाढदिवस. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘उमराव जान’ या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील ‘जुस्तजू जिसकी थी....’ या गीताचा...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language